मी नाराज नाही- विनोदकुमार बिन्नी

नवी दिल्ली: पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या आम आदमी पार्टीमध्ये मंत्रिपदावरून नाराजी नाटय सुरु आहे. आगामी काळात पक्षात या ना त्या. कारणाने कलह सुरूच राहणार आहेत. संभाव्य मंत्रिमंडळात स्थान नसल्याने नाराज झालेल्या विनोदकुमार बिन्नी यांची समजूत काढण्यात आपचे नेते यशस्वी झाले आहेत. त्या मुळेच मी नाराज नाही अशी प्रतिक्रिया विनोदकुमार बिन्नी यांनी दिली आहे.

आपचे नेते कुमार विश्वास यांच्यासह काही नेते मंडळी मंगळवारी मध्यरात्री बिन्नी यांच्या घरी पोहचले. यावेळी त्यांच्यात जवळपास दोन ते तीन तास चर्चा झाली. चर्चेनंतर बाहेर आलेल्या आपच्या नेत्यांनी विनोदकुमार बिन्नी नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

उलट या नाराजीच्या बातमीबद्दल आपच्या नेत्यांनी माध्यमांनाच दोष दिला. पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल ती आपण स्वीकारण्यास तयार असल्याचं विनोदकुमार बिन्नी यांनी यावेळी बोलताना स्पबष्टस केले. आगामी काळात विनोदकुमार बिन्नी यांना संसदीय सचिवपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

आम आदमी पक्षाच्या सहा संभाव्य मंत्र्यांची नावे काल जाहीर झाली. मात्र या यादीत आपले नाव नसल्याने पक्षाचे आमदार विनोद बिन्नी हे नाराज झाले होते. केजरीवाल यांच्या निवासस्थानी पक्षाची बैठक सुरु असताना बिन्नी यांनी मध्येच काढता पाय घेतला होता. शिवाय आपण केजरीवाल यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचाही दावा बिन्नी यांनी केला होता. त्यामुळे आपच्या नेत्यांची धावपळ झाली.