मिलिंद पाटणकर अजूनही पक्षाच्या संपर्कात

ठाणे – एकीकडे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांचा सोमवारी सायंकाळपासून कोणताही माग लागत नाही. भाजपने मात्र ते अजूनही पक्षाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे. सोमवारी शिवसेनेला परिवहन समितीचे सभापतीपद गमवावे लागल्याने शिवसैनिकांनी आपला रोष मिलिंद पाटणकर यांना मारहाण करून प्रदर्शित केला. त्यानंतर त्यांच्याकडून उपमहापौरपदाचा राजीनामा तडकाफडकी घेऊन तो मंजूर देखील करण्यात आला.

आगामी काळात पाटणकर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात शिवसेनेऐवजी भाजपचे नगरसेवकच आघाडीवर होते. गटनेते संजय वाघुले यांनी तर संतापाच्या भरात पाटणकर यांना जाहीरपणे मारहाण करत शिवीगाळही केली. त्यामुळे हा सगळा वृत्तांत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या कानी घालण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नेते रवाना झाले.

गेल्या दोन दिवसांपासून पाटणकर यांचा ठावठिकाणा कुणालाच माहिती नाही. शिवसेनेचे नेते त्याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. भाजपचे माजी आमदार संजय केळकर यांचा फोन स्विच ऑफ होता. तर गटनेते संजय वाघुले यांनी ते पक्षाच्या संपर्कात असल्याचे सांगितले. मात्र ते नेमके कोठे आहेत, ते आपल्यालाही माहीत नसल्याचे सांगितले.

Leave a Comment