कांद्यावरुन कोणी पाठशी उभे राहिले नाहीः शरद पवारांची खंत

नाशिक – आम आदमी पार्टीचे दिल्‍लीत सरकार स्‍थापन होणार आहे. मुख्‍यमंत्रीपदावर विराजमान होणारे अरविंद केजरीवाल कशा पद्धतीने काम करतात आणि महागाईवर कसे नियंत्रण मिळवतात, हे पाहणे उत्‍सुकतेचे राहणार आहे, केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी सांगितले. नाशिकमध्‍ये कांदा उत्‍पादक शेतक-यांचा मेळावा झाला. त्‍यात ते बोलत होते.

पवारांनी केजरीवाल यांच्‍यावर कटाक्ष टाकताना कांदा उत्‍पादक आणि व्‍यापा-यांवर नाराजी व्‍यक्त केली. जेव्‍हा चांगला भाव मिळाला त्‍यावेळी संसदेत माझ्यावर टीका होत होती. परंतु, तुम्‍ही साथ दिली नाही, अशा शब्‍दांत पवारांनी मनातली खंत व्‍यक्त केली. शरद पवार म्‍हणाले, दिल्‍लीतील दोन सरकारांचे कांद्यामुळे पतन झाले. आता केजरीवाल म्‍हणतात कांद्याचे दर निम्‍म्यावर आणू. ते कसे दर कमी करतात, याकडे आमचे लक्ष राहणार आहे.

कांदा उत्‍पादक शेतक-यांना उद्देशून पवार म्‍हणाले, एका बाबतीत माझी तुमच्‍यावर नाराजी आहे. कांद्याचे दर वाढले होते. त्‍यावेळेस संसदेत माझ्यावर टीका होत होती. लोक मला शिव्‍या घालत होते. परंतु, दरवाढ झाली त्‍यावेळी त्‍या शेतक-याला दोन पैसे जास्‍त मिळाले. या कांदा उत्पादकांचे दुखणं मांडण्याचे काम मी एकटा करत होते. परंतु, त्‍यावेळी नाशिक जिल्ह्यातून एकही जण माझ्या उभा राहिला नाही. सगळ्या देशातून लोक मला शिव्या घालत होते. पण, त्‍याचवेळी नाशिककर खूष होते. कारण, कांद्याचा भाव वाढला होता.

आमचे म्हणणं एकच आहे, की तुमची बाजू जे मांडतात निदान त्यांची तरी नोंद घेत जा. नाहीतर कांद्याचे भाव कमी झाले की, तुम्ही आम्हाला शिव्या द्यायच्या आणि कांद्याचे भाव वाढले तर तिकडून दुसरे आम्हाला शिव्या देतात आणि आम्हाला बघ्याची भूमिका घ्यावी लागते. हे कसे चालणार? हे सगळे एकतर्फी नको. आज सबंध देशात कांद्याचा मोठा व्यापार करणारा जो या भागातला व्यापारी वर्ग आहे, त्यानेही जबाबदारी घेतली पाहिजे. कांद्याला जेव्‍हा भाव मिळतो, त्‍याचा लाभ शेतक-यांना दिला पाहिजे.

Leave a Comment