रामदेव बाबा करणार सोनिया,राहुल विरोधात प्रचार

लखनौ – येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधींविरोधात प्रचार करण्याचा निर्णय योगगुरु रामदेव बाबा यांनी जाहीर केला आहे. लखनौ येथील एका कार्यक्रमादरम्यान रामदेव बाबा यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या रायबरेली व अमेठी या मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांच्याविरोधात प्रचार करण्याचा मनोदय व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधान पदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना रामदेव बाबा यांनी यावेळी पूर्ण पाठिंबा दिला. मोदी यांनी भारताचे पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा रामदेव बाबांनी यावेळी व्यक्त केली.

मोदी यांच्यासंदर्भात आपल्याला अनेक अपेक्षा व पूर्ण विश्‍वास’ असल्याचे रामदेवबाबांनी सांगितले. मात्र आपला पाठिंबा हा भाजपला नसून केवळ मोदींना असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येत्या लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस पक्ष हा इतिहासजमा होईल, असे मत रामदेव बाबांनी यावेळी व्यक्त केले.

आपण कोणत्याही राजकीय पक्षामध्ये जाणार नसून निवडणूकही लढविणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कॉंग्रेस पक्ष परदेशातील काळे धन भारतात परत आणण्यासंदर्भात उपाययोजना करत नसल्याबद्दल केलेल्या आंदोलनामुळे आपल्याविरोधात उत्तराखंड येथील कॉंग्रेसचे सरकार व केंद्र सरकार मोहिम राबवत असल्याचा आरोपही योगगुरुंनी केला आहे.