राजस्थानात पाकिस्तानातील मोबाइल नेटवर्क; हेरगिरीची शक्यता!

जयपूर- राजस्थानात पाकिस्तानी मोबाइल नेटवर्क मिळत असल्याने खळबळ माजली आहे. मोबाइल धारकांची ससेहोलपट होतेय ती तर दूरच मात्र या माध्यमातून पाकिस्तान भारतात हेरगिरी करत असल्याचा संशयही बळवला आहे. राजस्थानातील बाडमेर हे गाव भारत-पाक सीमेपासून जवळ आहे. बाडमेर गावातील प्रत्येक मोबाइलवर पाकिस्तानचे मोबाइल सिग्नल मिळत आहेत. त्यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात सापडली आहे.

एका देशातील मोबाइल नेटवर्क दुसर्‌या देशात दिसत असेल तर ते बेकायदा आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार तो मोठा गुन्हा आहे. परंतु बाडमेर गावात पाकिस्तानी मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क सहज मिळत आहे. त्यामुळे काही लोक पाकिस्तानातील लोकांशी सहज संपर्क साधत असावेत. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला याबाबत माहित आहे. विशेष म्हणजे त्यांनी संरक्षण मंत्रालयाला याबाबत सूचितही केले आहे. परंतु आजतागायत याप्रकारावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.

केंद्र सरकारकडून याबाबत दूरसंचार विभागाच्या टीआरएआयला लक्ष ठेवण्याची सूचनाही देण्यात आली आहे. भारत-पाक दरम्यान आतापर्यंत अनेकदा शिखर बैठका झाल्या. त्यातही याबाबत चर्चा झाली होती. मात्र आजपर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.

पाकिस्तानने सगळे नियम ढाब्यावर बसवून सीमेवर मोबाइल टॉवर उभारले आहेत. मुनाबाव, बाखासर, सज्जन का पार, जानपालिया, भभुते की ढाणी, लकडियाली, चांदे का पार, अम्मी का पार, त्रिमोही, अकालीसह सीमेवर असलेल्या भारतातील बहुतेक गावांमध्ये पाकिस्तानी मोबाइल कंपनीचे नेटवर्क मिळते.