पतीचे प्राण वाचविण्यासाठी दौडल्या लताबाई

पुणे – केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या जन्मदिनी म्हणजे १२ डिसेंबरला बारामती येथे आयोजित केलेल्या ३ किमीच्या पळण्याच्या शर्यतीत विजयी ठरलेल्या ६६ वर्षीय लताबाई करे पतीचे प्राण वाचविण्यासाठी दौडल्या असे समजते.

लताबाईंचे पती हृदयरोगाने आजारी असून त्यांच्या उपचारासाठी १५ हजार रूपयांची आवश्यकता आहे. मोलमजुरी करून जगणार्‍या लताबाईंनी पतीच्या उपचारासाठी अनेकांकडे पैसे उसने मागितले मात्र सगळीकडे नकारघंटा ऐकावी लागली. त्याचवेळी या पळण्याच्या स्पर्धेसाठी ५ हजार रूपयांचे बक्षीस मिळणार असल्याचे त्यांना समजले. अनेक युवा, गांवकरी या स्पर्धेसाठी जय्यत तयारीत बूट, पळण्याच्या पोशाखात आले होते मात्र लताबाई अनवाणी पायानेच हिरवा झेंडा दाखविताच पळाल्या. रेस पूर्ण करताना त्यांना चांगलीच धाप लागली होती मात्र रेस जिंकून त्यांनी विक्रम नोंदविलाच आणि पतीच्या उपचारासाठी पाच हजार रूपयेही मिळविले.

जवळची सगळी शिल्लक तीन मुलींच्य लग्नात खर्च झाली. मुलगा मजुरी करतो. पतीवर उपचार तर व्हायलाच हवेत. पण पैसे कुठून आणणार असा प्रश्न लताबाईंच्या पुढे होता. मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर गांवच्या लताबाईंनी हा प्रश्नही कष्टातूनच पण जिद्दीने सोडविला.

Leave a Comment