महाराष्ट्रातील ३३ जागांवर विजय मिळेल- मुंडे

मुंबई – आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रावर भाजपची मोठी भिस्त आहे. त्यातूनच आगामी निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना-रिपब्लिकन महायुतीला ३३ जागांवर विजय मिळेल, असा ठाम दावा विश्वास ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. मुंबईमध्ये झालेल्या मोदींच्या सभेला मोठी गर्दी जमली होती.

सभेप्रसंगी मुंडे यांच्या भाषणानंतर राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी महाराष्ट्रातून ४८ पैकी ४६ जागांवर विजय मिळालाच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून मुंडे, फडणवीस, आदी नेतेमंडळींची चांगलीच पंचाईत केली. निवडणुकीच्या रणमैदानात जेथे ३३ जागा मिळवितानाही दमछाक होणार आहे आणि विजयाची शाश्वती नाही, तेथे ४६ जागांवर विजय कसा मिळणार, असा प्रश्न नेत्यांना व कार्यकर्त्यांना पडला होता.

मोदींच्या सभेला भाजप नेत्यांनी जंग जंग पछाडून गर्दी जमविण्यासाठी प्रयत्न केले. सोशल मीडीया, करोडो एसएमएस, ई-मेल याद्वारे निमंत्रणे दिली. हजारो बस व खासगी वाहने, २२ विशेष रेल्वेगाडय़ा यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. भाजपने स्वबळावर ही सभा घेतल्याने गर्दीचे गणित यशस्वी होईल की नाही, अशी शंका घेतली जात होती. पण दोन लाखाहून अधिक कार्यकर्त्यांच्या गर्दीने वांद्रे-कुर्ला संकुलाचे भव्य मैदान व परिसर फुलून गेला आणि भाजप नेत्यांचा उत्साह दुणावला होता.

Leave a Comment