महागर्जना रॅलीवर आतंकवादी हल्ल्याचे सावट

मुंबई – भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजराथ मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत उद्या होत असलेल्या महागर्जना रॅलीवर आतंकवादी हल्ल्याचे दाट सावट पसरले आहे. मोदी यांच्या हत्येसाठी केवळ देशातीलच नव्हे तर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना सज्ज झाल्या आहेत. त्यातच पाकिस्तानच्या आयएसआयने मोदींच्या हत्येची सुपारी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला दिली असल्याचेही वृत्त आहे. दाऊद कराचीत राहात असला तरी मुंबईतील त्याचे नेटवर्क नव्याने उभारले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे मुंबईतील मोदींच्या सभेत कांही गडबड होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्टाचे भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रूडी म्हणाले की पाटण्यातील मोदींच्या सभेत बॉम्ब स्फोट करण्यात इंडियन मुजाहिद्दीनचा हात होता हे सिद्ध झाले आहे. मुंबईतही असा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन १० हजार पोलिसांसह पक्षाचे ५ हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. या सभेला पाच लाखांहून अधिक लोक येतील असे संकेत मिळाले आहेत यामुळे गर्दी नियंत्रणाचे मोठेच आव्हान आहे.

या रॅलीत पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंग, माजी अध्यक्ष नितीन गडकरी, महाराष्ट्राचे नेते गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे व अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र लालकृष्ण आडवानी या सभेला उपस्थित राहणार नाहीत. या सभेचे निमंत्रण अमेरिकेसह मुंबईतील अन्य देशांच्या दूतावासांनाही देण्यात आल्याचे समजते.

Leave a Comment