मुंबई- अमेरिकन सरकारने माझ्या मुलीवर अन्याय केला आहे. अमेरिकेने नुसता खेद व्यक्त करू व माफी मागू नये. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. जर न्याय मिळाला नाही तर आपण आमरण उपोषण करू, असा इशारा देवयानीचे वडील व माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी दिला आहे. उत्तम खोब्रागडे हे कालच रात्री दिल्लीतून विविध राजकीय नेत्यांची व प्रशासकीय अधिका-यांची भेटी घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत.
याप्रकरणी आज अमेरिकेने खेद व्यक्त केला आहे तसेच माफी मागितली आहे. मात्र हे प्रकरण माफीवर मिटवू नये, माझ्या मुलीवर तेथील सरकारने दाखल केले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले, यासाठी मी 30 डिसेंबर रोजी दिल्लीत जाणार आहे. माझ्या मुलीवर अन्याय झाला आहे. तेथे विदेशी लोकांना लक्ष्य करणा-या टोळ्या कार्यरत असतात. त्याचा फटका देवयानीला बसला आहे. पण भारत सरकारने याबाबत आक्रमक भूमिका घ्यावी.
देवयानी ही हुशार, गुणवंत अशी महाराष्ट्राची कन्या आहे. तिचा असा अपमान आपण कोणीही सहन करता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी देवयानीप्रकरणी लवकरच तोडगा निघेल असे म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी लवकरच खुर्शीद यांच्याशी आज बातचीत करणार आहेत, अशी परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे.