नवी दिल्ली – डीएमकेचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ‘चांगली व्यक्ती’ आहेत अशी स्तुती करत आपली वाट बदलता येईल असे संकेत दिले आहेत. भाजपने मात्र डीएमकेशी युती करण्यात अद्याप स्वारस्य दाखवलेले नाही. दरम्या न, आगामी लोकसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेस अथवा भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांशी युती करणार नसल्याचे डीएमकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नुकतेच करुणानिधींनी मोदींची भरभरून स्तुती केली. यावेळी बोलताना करुनानिधी म्हणाले, ‘नरेंद्र मोदी हे एक चांगली व्यक्ती आहेत, असे आपले वैयक्तिक मत आहे. त्यांनी गुजरातच्या विकासाची पूर्णत: काळजी घेतली असल्याचे सांगत एक प्रशासक म्हणून आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत, असे मत करूणानिधींनी व्यक्त केले.
यामुळेच गुजरातच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना सलग तीनवेळा निवडून दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ते देशाचा कारभार चालवण्यास योग्य आहेत की नाहीत, याचा निर्णय जनताच घेईल’, अशी सावध भूमिकाही त्यांनी घेतली. विधानसभा निवडणुकीत भाजपला चार राज्यात जे यश मिळाले ते केवळ मोदीमुळे शक्य झाले आहे.