संसदेचे अधिवेशन एक धूळफेक

नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन ठरलेल्या कार्यक्रमापेक्षा दोन दिवस आधी अनिश्‍चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आले. दिल्लीत सध्या निवडणूक आयोगाच्या ज्या हालचाली सुरू आहेत त्यांचा विचार करता आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जी लगबग सुरू केली आहे तिचा विचार करता हे सध्याच्या म्हणजे १५ व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन ठरू शकेल.

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गेल्या आठवड्यात काही थोडा कालावधी वगळता कामकाज झाले नाही. मात्र शेवटच्या दोन दिवसात लोकपाल विधेयकाच्या निमित्ताने शांततेने कामकाज झाले. कारण हे विधेयक मंजूर करण्यात सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षांनाही रस होता. अन्यथा बाकीचे दिवस दोन्ही सभागृहाचे कामकाज गोंधळातच गुंडाळण्यात आले.

गेल्या ५ डिसेंबरला हे अधिवेशन सुरू झाले होते आणि २० तारखेपर्यंत ते चालणार असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते. परंतु ते दोन दिवस आधी संपवले गेले. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारवर कामकाजापासून पळ काढत असल्याचा आरोप केला. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला.

Leave a Comment