वॉरन बफे यांची रोजची कमाई ३.७ कोटी डॉलर्स

प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी २०१३ सालात दररोज ३.७ कोटी डॉलर्स कमावले असल्याचे वेल्थ एक्स या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. या वर्षी सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश बनण्याचा मान बफे यांना मिळाला आहे. मात्र तरीही ते सर्वाधिक श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

या सर्वेक्षणानुसार पहिल्या क्रमांकावर मायक्रोसॉफटचे बिल गेटस आहेत. बिल यांच्या संपत्तीत यावर्षी ११.५ अब्ज डॉलर्सची वाढ होऊन ती ७२.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. तर बफे यांची संपत्ती १२.७ अब्ज डॉलर्सने वाढून ५९.१ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. जगातील श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीतील पहिल्या दहा अब्जाधीशांची संपत्ती या वर्षात १०१.८ अब्ज डॉलर्सने वाढली आहे आणि ही एकूण संपत्ती ३४७ अब्ज डॉलर्सवर केली आहे.

या यादीत तिसरा क्रमांक कॅसिनो व्यावसायिक शेल्डन एडल्सन यांचा आहे. त्यांची संपत्ती आहे ३५ अब्ज डॉलर्स चवथ्या क्रमांकावर अॅमेझॉनचे संस्थापक सीइओ जेफ बेजेस आहेत. त्यांची संपत्ती ३४.४ अब्ज डॉलर्स आहे. पाचव्या क्रमांकावर फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग असून त्याची संपत्ती आहे २४.७ अब्ज डॉलर्स.