हिंदू धर्म संपवण्यासाठी जादूटोणाविरोधी विधेयकाचा डाव – कदम

नागपूर – जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर विधानपरिषदेतही मांडण्यात आले. विधानपरिषदेत या विधेयकाला विरोध करताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी ‘हे विधेयक म्हणजे हिंदू धर्म संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने घेतलेली सुपारी आहे’ असा गंभीर आरोप केला आहे. हिंदू धर्म संपवण्यासाठीच अंनिसला परदेशातून पैशांचा पुरवठा होतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या विधेयकावर चर्चा होणार आहे.

सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी जादूटोणाविरोधी विधेयक विधानपरिषदेत माडंले. त्यानंतर कदम यांनी या विधेयकाला विरोध करत अंनिसवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. यावेळी त्यांनी नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या हेतूविषयीही शंका उपस्थित केली.

यावर, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कदम यांना, हा पैसा परदेशातून आलेला असला तरी तो दाभोलकरांना व्यक्तिगत पुरस्कार स्वरुपात मिळालेला होता, त्यांनीच तो अंनिसच्या कार्यासाठी देणगी स्वरुपात दिला होता, अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेने दाभोलकरांना हा पुरस्कार दिला होता. अमेरिकेतील या मराठी संस्थेने याआधाही अनेक दिग्गजांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, असे स्पष्ट उत्तर दिले.

यावर, नरेंद्र दाभोलकर आणि अंनिसवर झालेले आरोप खोडसाळ आहेत. अशा प्रकारचे आरोप अंनिस आणि दाभोलकरांच्या कार्याला धक्का पोचवू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment