घरकुल घोटाळा प्रकरणी गुलाबराव देवकरांचा जामीन रद्द

जळगाव – बहुचर्चित घरकुल घोटाळा प्रकरणातील संशयित माजी परिवहन राज्यमंत्री आमदार गुलाबराव देवकर यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) रद्द केला. यामुळे देवकर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. याशिवाय जळगाव जिल्हा न्यायालयात सुरू असलेला घरकुल घोटाळ्याचा खटला धुळे येथील न्यायालयापुढे चालविण्याचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

राज्यभर गाजत असलेल्या जळगावच्या नगरपालिका घरकुल घोटाळा प्रकरणात तत्कालीन नगराध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री आमदार गुलाबराव देवकर हे संशयित असून, त्यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला प्रेमानंद जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. यावर खंडपीठाने आमदार देवकर यांचा जामीन अर्ज रद्द केला होता.

या निर्णयाविरोधात देवकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सरकार पक्ष, बचाव पक्ष तसेच त्रयस्थांच्या वतीने वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल गेल्या महिन्यात राखीव ठेवला होता. दरम्यान, आज न्यायमुर्ती एच. एम. गोखले व न्यायमुर्ती चलमेश्‍वर रॉय यांच्या न्यायालयाने आमदार देवकर यांचा जामीन रद्दबातल ठरविला.

दरम्यान, घरकुल घोटाळ्यातील आणखी एक संशयित आणि जळगावच्या कारागृहात असलेले आमदार सुरेश जैन यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी जळगाव जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. डॉक्टरांचे एक पथक आमदार जैन यांच्यावर उपचार करीत आहे.

Leave a Comment