मनमोहनसिंग पदावर राहणार

नवी दिल्ली – चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्यानंतर काही बदल करण्याचे संकेत कॉंग्रेस नेतृत्वाकडून दिले जात असले तरी त्या बदलामध्ये पंतप्रधान बदलण्याचा समावेश नाही आणि आहे तेच पंतप्रधान २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहतील, असे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुका त्यांच्या ठरलेल्या वेळीच होतील, त्यातही काही बदल केला जाणार नाही असेही पक्षातर्फे जाहीर करण्यात आले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या शुक्रवारी दि. १३ रोजी संपत आहे आणि त्यानंतर पक्षातल्या बदलांना गती येईल, असा अंदाज आहे. मात्र भारतीय जनता पार्टीने अधिवेशन लवकर आटोपण्यास विरोध केला असून या अधिवेशनातच लोकपाल बिल मंजूर केले जावे, अशी मागणी केली आहे. मात्र कॉंग्रेसचे नेते त्यास अनुकूल नाहीत. हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करावे या मागणीवरून अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे.

अण्णा हजारे यांच्या उपोषणाने लोकांच्या मनात प्रक्षोभ निर्माण होईल, तो टाळण्यासाठी विधेयक लवकर मंजूर करावे, असा भाजपाचा आग्रह आहे. परंतु कॉंग्रेसचे नेते त्या मताचे नाहीत. अण्णांची कशी तरी समजूत काढावी आणि येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी लोकपाल विधेयकाच्या पेचातून आपली सुटका करून घ्यावी, असे कॉंग्रेसच्या नेत्यांचे मत आहे.

Leave a Comment