उरुग्वेमध्ये मारिज्युआनाचा वापर वैध

मोंटेविडो (उरुग्वे) – दक्षिण अमेरिकेतील उरुग्वे या देशाने मारिज्युआना या मादक पदार्थाची विक्री आणि वापर करण्यास कायद्याने परवानगी दिली असून आता तिथे बाजारात मुक्तपणे हा मादक पदार्थ मिळू शकणार आहे. मारिज्युआना हा अफू, हशिश, चरस, गांजा यासारखाच मादक पदार्थ आहे आणि त्याची सवय जडलेला माणूस आयुष्यातून वाया जातो असे समजले जाते, परंतु उरुग्वेमध्ये मात्र हा पदार्थ आता खुल्या बाजारात औषधाच्या दुकानातून मुक्तपणे उपलब्ध होणार आहे.

मारिज्युआनाचे व्यसन करणार्‍या तरुणांची संख्या उरुग्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे लक्षात आले होते आणि या व्यसनापासून तरुणांना मुक्त करण्यासाठी सरकारने बरेच प्रयत्नही केले होते. परंतु या प्रयत्नांना फार फळ येईना, म्हणून सरकारने हा मार्ग पत्करला असून परवाना घेऊन आणि मर्यादित स्वरूपात वापरण्याची अनुमतीच द्यावी आणि त्या मार्गाने मारिज्युआनाचा वापर नियंत्रित करावा, असा निर्णय घेतला आहे.

आता उरुग्वेमध्ये मारिज्युआनाची लागवड, प्रक्रिया, साठवण, विक्री आणि विनियोग हे कायद्याने वैध ठरले आहे. मात्र या प्रत्येक पातळीवर सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. मारिज्युआनाचे व्यसन करणार्‍या लोकांनाही ते औषध दुकानात मिळेल, परंतु त्याच्या खरेदीची नोंद केली जाईल आणि दरमहा केवळ ४० ग्रॅम एवढाच मारिज्युआना त्याला मिळू शकेल.

मारिज्युआनाचा वापर असा कायद्याने मुक्त करणारा उरुग्वे हा जगातला पहिला देश ठरला आहे. या संबंधातील विधेयक मांडताना सरकारवर खूप टीका झाली. मात्र तिथल्या पार्लमेंटमध्ये हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. या कायद्याने केवळ मारिज्युआनाचाच वापर नियंत्रित केला जाईल असे नाही तर त्यातून उद्भवणारी गुन्हेगारी सुद्धा आटोक्यात राहील असे सरकारचे मत आहे.