राहुल गांधींविरुद्ध ‘आप’चे कुमार विश्‍वास

नवी दिल्ली – नवी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ७० पैकी २८ जागा जिंकल्याने आत्मविश्‍वास बळावलेल्या आम आदमी पार्टीने पुढचे पाऊल टाकण्याचे निश्‍चित केले असून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे नेते कुमार विश्‍वास यांना राहुल गांधी यांच्या विरोधात उभे करण्याचे ठरवले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष मनिष शिसोदिया यांनी काल एका मेळाव्यात बोलताना ही घोषणा केली.

आम आदमी पार्टी भाजपा आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे आव्हान स्वीकारण्यास तयार असल्याचे श्री. शिसोदिया म्हणाले. आपल्या पक्षाने विजयाचा आनंद साजरा केला असे म्हटले जाते, परंतु हा क्षण आनंद साजरा करण्याचा नाही. जोपर्यंत देशातला भ्रष्टाचार नष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही आनंद साजरा करणार नाही, असे श्री. शिसोदिया म्हणाले.

दिल्लीत झालेली निवडणूक ही अरविंद केजरीवाल यांची निवडणूक नव्हती, तर ती जनतेची निवडणूक होती. म्हणून भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस या दोन्ही भ्रष्ट पक्षांना पाठींबा देणार्‍या मतदारांनी आता आम आदमी पार्टीच्या मागे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.