सलमानच्या हिट अँड रन प्रकरणाची फेरसुनावणी

मुंबई: बांद्रा येथे २००२ साली झालेल्या हिट अँड रन प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिल्याने अभिनेता सलमान खानला दिलासा मिळाला खरा, पण या निर्णयाविरोधात मुंबईच्या एका वकिलाने उच्च न्यायायलयात आव्हान दिले आहे. अभिनेता सलमान खानचं हे प्रकरण अकरा वर्षांपर्यंत सुरु होते. त्यामुळे आता फेरसुनावणी करण्याची गरज का वाटली असा सवाल उपस्थित करत मिखैल डे यांनी याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने सलमान खानला दिलासा देत हिट अँड रन प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबईतील एक वकिल मिखैल डे यांनी याचिका दाखल करुन न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणार आहेत. मिखैल यांच्या माहितीनुसार याचिकेचा मसुदा तयार झाला आहे आणि पुढील दोन-तीन महिन्यात ही याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात येईल.

याचिकेत मिखैल डे यांनी म्हटलं आहे की, अकरा वर्ष जुन्या या प्रकरणाची फेरसुनावणी झाली तर सलमान खानविरोधात सुरु असलेला हा खटला कमकुवत होईल. या प्रकरणातला मुख्य साक्षीदार आणि सलमान खानचा बॉडीगार्ड रवींद्र पाटील याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे फेरसुनावणीत सलमानला निश्चितच फायदा होईल. त्यामुळे आपण या आदेशाला आव्हान देत आहोत.

Leave a Comment