लोकसभा निवडणुका होणार एक महिना आधी

मुंबई : आगामी काळात होत असलेली सोळावी लोकसभा निवडणूक एक महिना आधी होण्याची शक्यता आहे. एप्रिल- मे २०१४ च्या लोकसभा निवडणुका मार्च-एप्रिल महिन्यातच होण्याची दाट शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुका पुढील वर्षी १६ मे पूर्वी घेणं बंधनकारक आहे. पाच वर्षापूर्वी म्हणजे २००९ साली निवडणुकांची मतमोजणी १६ मे रोजी झाली होती. त्यामुळे त्यापूर्वी सोळावी लोकसभा अस्तित्वात येने गरजेचं आहे. त्यामुळेच येत्या काळात लोकसभा निवडणुका किमान एक महिना आधी होण्याची शक्यता आहे.

एक एप्रिल पासून नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंतच्या काळातील सरकारी खर्चासाठी लागणा-या लेखानुदानाला मंजुरी मिळण्यासाठी विशेष सत्र १३ ते १७ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. त्यावरून टाईम्सने २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका मार्च महिन्यातच होतील असा निष्कर्ष काढला आहे.

लेखानुदान मंजुरीचे सत्र लवकर बोलावण्यामागे दोन महत्वाची कारणे असल्याचे सांगितले जात आहे. एक तर संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळामुळे कामकाजाचा वेळ वाया जातोय. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सहा खासदारांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी सुरू केली आहे. चार राज्यातल्या पराभवामुळे सीमांध्रमधले काँग्रेस खासदार पक्षाविरोधात आणखी आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच कॉग्रेसकडून आगामी काळात लोकसभा निवडणुका किमान एक महिना आधी होण्याची शक्यता आहे.