नवी दिल्ली – चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा सफाया झाल्यामुळे अस्वस्थ होऊन सुरू झालेली कॉंग्रेसमधली कुजबूज आता उघड्यावर आली आहे. कॉंग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी कॉंग्रेसचे नेतृत्व दुर्बल असल्याची टीका केली आणि त्यांच्या पाठोपाठ आता कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांनी तशीच टीका पत्रकारांशी बोलताना केली.
कॉंग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर क्रांतीकारक बदल केले नाही तर कॉंग्रेसचा २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतला पराभव अटळ आहे, असे मणिशंकर अय्यर यांनी बजावले आहे. पराभवातूनही काही शिकता येते आणि या चार राज्यातल्या पराभवातून पक्षाला २१ व्या शतकात काय करावे लागेल याचा विचार करण्याचा धडा मिळाला आहे, असे अय्यर यांनी प्रतिपादन केले.
कॉंग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करायला फार उशीर केलेला आहे. कॉंग्रेस पक्षाकडे खूप कल्पना आहेत आणि योजना तर खूपच आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत पक्ष नेतृत्व निकडीने प्रयत्न करत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. कॉंग्रेस पक्षाच्या आंध्रातील सहा खासदारांनी आपल्याच सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. त्यापाठोपाठ पक्षाला हा घरचा आहेर मिळाला आहे. पक्षातली नेत्यांच्या मनातली खदखद प्रकट व्हायला लागली आहे.