मोदींच्या लोकप्रियतेमुळे फायदा – राजनाथ सिंह

नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळेच पक्षाला फायदा झाल्याचे मत भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी व्यक्त केले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजप चारही राज्यांमध्ये आपले सरकार स्थापन करेल. या राज्यांमध्ये आमचे मुख्यमंत्री असतील.

शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. निवडणुक झालेल्या राज्यांमध्ये पक्षाकडून निरीक्षकांचे नामंाकन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपला मिळालेल्या मताच्या टक्केवारीबाबतचा प्रश्‍नाला उत्तर देण्याचे मात्र त्यांनी टाळले. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे.

राहुल विरुद्ध मोदी अशी लढत काँग्रेसला अमान्य

दिल्लीसह चार राज्यांमधील निवडणुकांचा उल्लेख राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांच्यातील लढत म्हणून करण्यास काँग्रेसने स्पष्ट नकार दिला आहे. तसेच, या निवडणुकांमध्ये आलेल्या नामुष्कीचे खापर काँग्रेसने केंद्र आणि संबंधित राज्यांच्या सरकारांबरोबरच आपल्या प्रदेश शाखांवरही फोडले आहे. निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणुकांपूर्वी दिल्ली, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षांतर्गत संघर्षाचे दर्शन झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

काही केंद्रीय मंत्र्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्ये केली त्यामुळे चांगल्या योजनांचे श्रेय यूपीए किंवा काँग्रेसला मिळण्याऐवजी त्यांना गेले, अशी टीकाही त्यांनी केली. लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे आता राहुल पंतप्रधान पदाची धुरा स्वीकारतील, अशी चर्चा द्विवेदी यांनी फेटाळून लावली. पंतप्रधान मनमोहनसिंग त्यांचा कार्यकाल पूर्ण करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल यांनी उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वत:ची सक्रियता काहीशी कमी केल्याचे चित्र निर्माण झाले. आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 4-0 असा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे सोनिया पुन्हा पक्षाच्या कामकाजात पुढाकार घेतील, असा तर्क लढवला जात आहे. मात्र, हा तर्क द्विवेदी यांनी अमान्य केला. सोनिया या काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. पक्षाचे कामकाज त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरू आहे, असे ते म्हणाले

भाजपला मोदी फॅक्टरचा फायदा नाही – राष्ट्रवादी

देशातील चार राज्यांच्या आज जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने घौडदौड केलेली असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला फारसे महत्व देण्याचे टाळले. मोदी फॅक्टरचा पक्षाला फायदा झाला नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला. मात्र, त्याचवेळी काँग्रेसलाही या मित्रपक्षाने कानपिचक्या दिल्या आहेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, राजस्थान आणि मध्य प्रदेश ही राज्ये जनसंघापासून भाजपचे बालेकिल्ले आहेत.

छत्तीसगड आणि दिल्लीमध्ये मोदी फॅक्टरची जादू चाललेली नाही. मात्र, काँग्रेस आत्मसंतुष्ट बनली असून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न पक्षाने थांबविले आहेत, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या. या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का या प्रश्‍नाला थेट उत्तर देण्याचे मलिक यांनी टाळले. आगामी लोकसभा त्रिशंकु असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

Leave a Comment