भोपाळ -मध्यप्रदेशात भाजपने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. काँग्रेसला राज्याच्या सत्तेपासून पुन्हा दूर ठेवताना भाजपने तब्बल दोन-तृतीयांश इतके बहुमत मिळवले. या विजयामुळे शिवराजसिंह चौहान सलग तिसर्यांदा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री बनणार आहेत. मध्यप्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यातील तब्बल 160 जागांवर भाजपने विजय मिळवला. तर या राज्याची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी कंबर कसणार्या काँग्रेसला केवळ 57 जागांवर समाधान मानावे लागले.
स्वत: शिवराज यांनी विदिशा आणि बुधनी या दोन जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसने शिवराज यांना पर्याय म्हणूून ज्योतिरादित्य शिंदे या तरूण आणि प्रभावी नेत्याचे नाव पुढे केले होते. मात्र, शिवराज यांच्या करिष्म्यापुढे काँग्रेस पक्ष टिकाव धरू शकला नाही. मध्यप्रदेशातील विजयाच्या हॅट्ट्रिकमुळे शिवराज यांची प्रतिमा आणखीच उंचावणार आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून यापूर्वी त्यांचे नाव चर्चेत आले होते.
मात्र, 54 वर्षीय शिवराज यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीपासून दूर राहणेच पसंत केले. भूमिपुत्र, कौटूंबिक व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. साधेपणा, विनम्रता या गुणांमुळे त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. मध्यप्रदेशातील उल्लेखनीय कार्यामुळे हाय-प्रोफाईल मोदींशी सातत्याने होणार्या तुलनेकडे दुर्लक्ष करत ते नेहमीच लो-प्रोफाईल राहिले. शिवराज यांच्या कार्यामुळे आणि प्रतिमेमुळेच भाजपला मध्यप्रदेशात सलग तिसर्यांदा विजय मिळवणे शक्य आल्याचे मानले जात आहे.