नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासमवेत आज सकाळ दहाच्या सुमाराला निर्माण भवन येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. हाहंी भाग शीला दीक्षित उमेदवार असलेल्या नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात येतो. याच मतदारसंघात आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि दिल्ली प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष विजयेंद्र गुप्ता हे अन्य उमेदवार आहेत.
अरविंद केजरीवाल आणि शीला दीक्षित यांच्यातील लढत हे या निवडणुकीचे सर्वांत मोठे आकर्षण ठरले आहे. मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणारे दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार येथे समोरासमोर उभे ठाकल्याने या लढतीकडे सार्या देशाचे लक्ष लागले आहे. शीला दीक्षित ज्या मतदारसंघातून उभ्या राहतील तेथेच आपण उभे राहूू, असे अरविंद केजरीवाल यांनी या आधीच जाहीर केले होते. स्वतः केजरीवाल यांनी सकाळी सव्वाआठ वाजता हनुमान रोड मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. याच मतदारसंघात उपराष्ट्रपती हमिद अन्सारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी विजय देव यांनीही सकाळीच मतदान केले.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात सुमारे 1 लाख 18 हजार मतदार असून त्यातील साठ टक्के मतदार हे सरकारी कर्मचारी आहेत. गेली पंधरा वर्षे शीला दीक्षित या मतदारसंघातून निवडून येत आहेत.
राहुल गांधींनी रांगेत उभे राहून केले मतदान
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील औरंगजेब लेनमधील बुथ क्रमांक 88 वर जाऊन सकाळी मतदान केले. ते मतदान केंद्रावर गेले तेव्हा तेथे रांग होती. तेथे रंागेत उभे राहूनच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेदहा वाजता ते मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांच्यापुढे 25 मतदारांची रांग असल्याने सुमारे अर्धा तास त्यांना तेथे तिष्ठावे लागले. त्यानंतर आपला क्रमांक आल्यावर त्यांनी मतदान केले. ते ज्या केंद्रावर मतदान करणार होते तेथील इलेक्ट्रॉनिक मतदारयंत्रात सुरुवातीला काही काळ बिघाड झाल्याने मतदानाची प्रक्रिया काही काळ थांबवावी लागली होती; परंतु थोड्याच वेळात हा बिघाड दूर करण्यात आला. राहुल गांधी यांनी ज्या मतदान केंद्रावर मतदान केले त्या मतदारसंघात शीला दीक्षित या उमेदवार आहेत. याच केंद्रावर उद्योगपती सुनील मित्तल यांच्यासह अनेक व्हीआयपींनी मतदान केले.