मुंबई : शेअर बाजारात पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटले आहेत. वेगवेगळ्या न्यूज चॅनेल्स आणि वृत्तपत्राच्या एक्झिट पोलनंतर शेअर बाजारात गुरुवारी उत्साह संचारला आहे. पाच राज्यांमध्ये भाजपला सकारात्मक कौल असल्याचे भाकित एक्झिट पोलने केल्यानंतर सेन्सेक्सने २१ हजाराचा महत्वाचा टप्पा ओलांडला आहे.
चार पैकी तीन राज्यात भाजपची सत्ता येईल असे भाकित एक्झिट पोल्सने वर्तवलं आहे. याचा परिणाम गुरुवारी बाजार खुला होताच पाहायला मिळाला. आज ट्रेडिंगला सुरूवात होताच सेन्सेक्सने तब्बल चारशेपेक्षा जास्त पॉईन्टची उसळी घेऊन २१ हजार ४४८ चा टप्पा गाठला. टक्केवारीच्या हिशेबात ही वाढ दोन टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
एबीपी माझाच्या एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्यप्रदेश आणि राजस्थानात भाजपचीसत्ता येऊ शकते तर छत्तीसगढ आणि दिल्लीमध्ये काँग्रेसला धोका आहे.
निफ्टी या नॅशनल स्टॉक एक्चेंजच्या निर्देशांकातही १०० पेक्षा जास्त पॉईन्टची वाढ नोंदवण्यात आली. निफ्टीने ६ हजार २८७ चा टप्पा गाठला.
आज सकाळच्या सत्रात वधारलेल्या प्रमुख शेअर्समध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एल अँड टी, एचडीएफसी आणि भेल या कंपन्याच्या शेअर्सचा समावेश आहे. आज प्रामुख्याने सार्वजनिक तसंच खाजगी बँकांच्या शेअर्सना खरेदीदारांकडून मोठी मागणी आहे, त्यामुळेच बँक सेक्टरमध्ये आज मोठी तेजी आहे.
आज सकाळच्या सत्रात रूपयाही डॉलरच्या तुलनेत चांगलाच मजबूत झाला. डॉलरच्या तुलनेतील रूपयाच्या मुल्यात आज तब्बल 30 पैशांची वाढ नोंदली गेली. रूपया आता 61.75 या पातळीवर आहे. पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका हा आगामी लोकसभा निवडणुकांची सेमी-फायनल असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही सत्ता परिवर्तन होईल, असा विश्वास मार्केटच्या जाणकारांना वाटतो. त्यामुळे बाजाराने एक्झिट पोलच्या भाकितांमुळे ही सलामी दिली असल्याटचे समजते.