युआन ठरले २ नंबरचे सर्वाधिक वापरले जाणारे चलन

चीनच्या युआन चलनाने युरोला मागे टाकत जगात सर्वाधिक वापरले जाणारे दोन नंबरचे चलन होण्याचा मान पटकावला आहे. २०१३ सालात जागतिक व्यापार अर्थव्यवस्थेत अमेरिकन डॉलरपाठोपाठ युआन सर्वाधिक वापरले जाणारे चलन ठरले आहे. सोसायटी फॉर वर्ल्डवाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशनतर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. युआन चा वापर व्यापारासाठी करणार्‍यात चीन, हाँगकाँग, सिंगापूर, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या पाच देशाचा समावेश आहे.

आत्तापर्यंत डॉलर पाठोपाठ युरो जागतिक व्यापारात सर्वाधिक वापरले जात होते. २०१२ मध्ये या व्यापारात युरोचा वाटा ७.८७ टक्के तर युआनचा वाटा १.८९ टक्के असा होता. मात्र २०१३ सालात हेच प्रमाण अनुक्रमे ६.६४ टक्के व ८.६६ टक्के असे झाले आहे. जगभरातील निर्यातदार युआनचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले असून जागतिक व्यापारात चीनचे चलन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे ते निर्देशक आहे असे जाणकरांचे मत आहे. पिपल्स बँक ऑप चायनाचे व्हाईस गव्हर्नर यी गँग यांनी युआन आता ब्रिटीश पौंड आणि सिंगापूर डॉलर्सबरोबर थेट ट्रेडिग करू शकते असे सांगितले.