पुणे- पिस्तूलवरून आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाचे धागेदारे मिळणार असल्याची शक्यता पोलिस सुत्रांनी व्यक्त केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी मारेक-यांनी वापरलेले पिस्तुल इचलकरंजीच्या मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या याच्याकडून विकत घेतले असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. त्यामुळे या खूनाचा तपास आता लागण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांनी काहीदिवसांपूर्वीच मन्या तसेच त्याच्या तीन साथीदारांना नुकतेच एका खून प्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे दाभोलकर हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडल्याचा दावा करण्यात येत होता त्यामध्ये तथ्य असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागोरी हा अवैध शस्त्र विक्री करणा-या टोळीतील गुंड आहे. त्याला एटीएसनंही अवैध शस्त्रप्रकरणी अटक केली होती. तसेच त्याच्याकडून ४५ पिस्तुल जप्त केली होती. पुणे विद्यापीठातले रखवालदार प्रल्हाद जोगदंडकर यांच्या हत्येप्रकरणी तो सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत आहे.
दोघांची हत्या एकाच प्रकारच्या पिस्तुलातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दाभोलकर यांची हत्या ७.६५ बनावटीच्या पिस्तुलाने झाली होती. त्यामुळे अशा प्रकारची पिस्तुल बाळगणा-या मन्याकडूनच दाभोलकरांच्या मारेक-यांनी पिस्तुल विकत घेतली असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागोरीने कुणाला पिस्तुल विकले होती, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.