भ्रष्टाचाराला सोनिया, पंतप्रधानच जबाबदार

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भ्रष्टाचाराच्या संदर्भात कॉंग्रेसवर प्रखर टीका केली. कॉमन वेल्थ भ्रष्टाचारापासून ते कोळसा घोेटाळ्या पर्यंत कोणत्याही भ्रष्टाचारापासून सरकारला सुटका करून घेता येणार नाही. या भ्रष्टाचाराला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहनसिंग हेच जबाबदार आहेत, असे अडवाणी यांनी प्रतिपादन केले.

भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातला सर्वाधिक वाईट कालावधी म्हणून आपण संपु आघाडीच्या दहा वर्षाच्या कालावधीचा उल्लेख करू, असे अडवाणी म्हणाले. या दहा वर्षामध्ये जेव्हा जेव्हा कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा त्यांनी ते कॉंग्रेसने केले नसून मित्र पक्षांनी केले आहे असा बचाव केला. परंतु अलीकडे घडलेल्या अनेक घटनांमध्ये कॉंग्रेसचा सुद्धा हात असल्याचे दिसले आहे, अशी घणाघाती टीका अडवाणी यांनी केली.

पंतप्रधान हे कोळसा घोटाळ्याला जबाबदार आहेत हे तर चौकशीत दिसून आले आहेच, पण पंतप्रधान मनमोहनसिंग हे सोनिया गांधी यांनी सांगितल्याशिवाय काहीच करत नाहीत. तेव्हा या सगळ्या भ्रष्टाचारातून सोनिया गांधी यांना सुद्धा मुक्त करता येणार नाही असे ते म्हणाले. आपले पंतप्रधान अर्थशास्त्रज्ञ असूनही त्यांच्या पंतप्रधानकीच्या काळात अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन सर्वात वाईट पद्धतीने झाले आहे, असे अडवाणी म्हणाले.

Leave a Comment