
इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज त्यांच्याकडील काही खात्यांचा भार कमी केला. त्यानुसार संरक्षणमंत्रिपदाची सूत्रे ख्वाजा मुहम्मद असिफ यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज त्यांच्याकडील काही खात्यांचा भार कमी केला. त्यानुसार संरक्षणमंत्रिपदाची सूत्रे ख्वाजा मुहम्मद असिफ यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
पाकिस्तानात जूनमध्ये शरीफ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. संरक्षण, परराष्ट्र यांसारखी महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवण्याचा निर्णय शरीफ यांनी सत्ताग्रहण करताना घेतला होता. 35 बेपत्ता व्यक्तींचा तपास संथगतीने सुरू असल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी उद्या (गुरुवार) हजर राहावे, असा आदेश नुकताच पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
या पार्श्वभूमीवर, शरीफ यांनी आज संरक्षणमंत्रिपदाची सूत्रे ख्वाजा असिफ यांच्याकडे सोपवली. संबंधित बेपत्ता व्यक्ती गुप्तचर यंत्रणांच्या ताब्यात असल्याचा अंदाज आहे. दहशतवादी कृत्यांमध्ये सामील असल्याबद्दल त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, ख्वाजा असिफ यांच्याकडे संरक्षणमंत्रिपदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. सरकारच्या स्थापनेपासून ते जलसंपदा आणि ऊर्जामंत्री आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री परवेझ रशिद यांनाही कायदा, न्याय आणि मानवाधिकार खात्यांची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. शरीफ सरकारच्या स्थापनेपासून कायदा आणि न्याय खात्यांची जबाबदारी कुणाकडेच देण्यात आली नव्हती.