मुलगा होत नाही : ५६ महिलांची हत्या

लाहोर – पाकिस्तानमध्ये महिलांची अवस्था अतिशय वाईट असून मुलीला जन्म देणार्‍या महिलांना त्यांच्या सासरचे लोक चक्क मारून टाकत आहेत. पाकिस्तानात गेल्या वर्षभरामध्ये ५६ महिलांना केवळ मुलगा होत नाही म्हणून मारून टाकलेले आहे, अशी माहिती पाकिस्तानातील मानवाधिकारवादी कार्यकर्ते आय.ए. रेहमान यांनी एका चर्चासत्रात बोलताना दिली.

ज्या देशामध्ये मातांना मुलगा होत नाही म्हणून मारून टाकले जाते तो देश नैतिक तत्वावर चाललेला आहे असे कसे म्हणणार, असा भेदक प्रश्‍न त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. जानेवारी २०१२ ते सप्टेंबर २०१३ या कालावधीत पाकिस्तानात ९० महिलांवर ऍसिड हल्ले झाले तर ७२ महिला जाळून मारल्या गेल्या, अशी धक्कादायक आकडेवारी त्यांनी सांगितली.

पाकिस्तानात गेल्या वर्षभरात कौटुंबिक हिंसाचाराची ४९१ प्रकरणे नोंदली गेली. सामूहिक बलात्काराचे ३४४ तर हिंसाचाराचे ८३५ गुन्हे नोंदवले गेले असल्याचे आय.ए. रेहमान म्हणाले. पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे उलटून गेली, परंतु अजूनही पाकिस्तानच्या मोठ्या भागात मुलीला शिकवणे हा गुन्हा ठरवला जातो याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.