ऊसदरप्रश्नी शिष्टमंडळ आज पंतप्रधानांची भेट घेणार

मुंबई: महाराष्ट्रातील सर्व पक्षीय शिष्टमंडळ ऊसदर वाढीच्या मागणीसाठी मंगळवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १४ जणांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेईल. संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार आहे. त्याआधी दुपारी दोन वाजता दिल्लीत सर्वच नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होईल. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासदार राजू शेट्टींनी ऊसला पहिला हप्ता तीन हजार रुपये द्यावा अशी मागणी केली आहे. त्यासाठी जोरदार आंदोलनालाही सुरुवात केली आहे. जोपर्यंत ऊसाला तीन हजार रुपये पहिला हप्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार राजू शेट्टींनी केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ऊसदरवाढीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, आता शेतक-यांच्या माता-भगिनीही सरसावल्या आहेत. कराड तालुक्यातल्या कोडोली आणि कपिल या गावातल्या महिलांनी रात्रंदिवस जागून सुमारे २५ हजार भाक-या, उसळ आणि खर्डा आंदोलकांसाठी पाठवला आहे. प्रिती संगमावर सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक सध्या याच शिदोरीवर लढत आहेत. सर्वांचेच आता मंगळवारी पंतप्रधानासमवेत होत असलेल्याख चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment