माढा मतदारसंघासाठी रामराजे निंबाळकर दावेदार

पुणे – राष्ट्रवादी काँगेसचे संस्थापक व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी यंदाची म्हणजे २०१४ सालची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर ते प्रतिनिधित्व करत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर या जागेसाठी प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले जात असले तरी नेतेच या जागेसाठी योग्य उमेदवार निवडतील असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचे म्हणणे आहे.

काकडे म्हणाले की पवार साहेब राज्यसभेवर जाणार हे आता निश्चित आहे. त्यामुळे त्यांची जागा कुणाला मिळणार या विषयी अनेक तर्क केले जात आहेत. मात्र राष्ट्रवादी ही लोकशाही पार्टी असून नेत्यांशी विचार विनिमय केल्यानंतरच या बाबतचा निर्णय होऊ शकतो. उमेदवारांची पहिली यादी निश्चित करण्यासाठी आमच्या नेत्यांची लवकरच बैठक होत आहे त्यात या जागेसाठीचा उमेदवारही ठरविला जाईल.

२००९ सालीही पवारांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते मात्र निवडणुकीला महिन्याचा अवधी राहिल्यावर त्यांनी आपला बारामतीचा मतदारसंघ कन्या सुप्रिया सुळेसाठी मोकळा करून सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. सोलापूर हा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे माढ्यातून राष्ट्रवादीचा प्रबळ उमेदवारच दिला जाईल असा जाणकारांचा अंदाज आहे.

Leave a Comment