अभिनेत्यांप्रमाणे नेतेही जपतात स्टाईल

प्रत्येक अभिनेता त्याच्या खास स्टाईलवरून ओळखला जात असतो त्यात प्रामुख्याने पोषाख महत्त्वाचा ठरत असतो. मात्र आपली ही पोषाखी स्टाईल जपण्यासाठी केवळ सिनेअभितेनेच दक्ष असतात असे नाही तर राजकीय नेतेही आपली खास स्टाईल जपत असतात असे फॅशन जगताचे म्हणणे आहे. राजकीय नेतेही आपल्या पोषाखाबाबत अतिशय चोखंदळ आणि दक्ष असतातच पण त्यातून आपल्या व्यकितमत्वाची ओळख होईल याचीही काळजी घेत असतात.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदी यांच्याकडे पाहिले तर ते अर्ध्या बाहीचा कुर्ता आणि चुडीदार अधिक पसंत करतात असे दिसेल. त्यातही कॉटन व लायनिग असलेले कुर्ते ते अधिक वापरतात. हा पारंपारिक पोषाख उठून दिसतो पण त्यातही मोदी अन्य रंगांपेक्षा भगवा रंग अधिक पसंत करतात. त्यातून त्यांच्या व्हायब्रंट व्यक्तीमत्त्वाचा परिचय होतो असे जाणकारांचे मत आहे. अर्थात कवचित प्रसंगी ते पठाणी सूटही वापरतात.

भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग नेहमी पांढरा कुर्ता पायजमा वापरणे पसंत करतात. परदेशात जाताना ते बंद गळ्याचे सूट वापरतात. मनमोहनसिग यांचे सौम्य व्यकितमत्व त्यातून प्रकट होते. पंतप्रधान देशाचे सर्वोच्च नेते असले तरी त्यांच्या पोषाखांचा रंग मात्र त्याला अनुरूप नाही असे फॅशन जाणकारांचे म्हणणे आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पोषाखावर सासूबाई माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दाट छाया दिसते. सोनियांचा ड्रेसिंग सेन्स उत्तम समजला जातो. भारताच्या विविध राज्यात बनणार्‍या सुती साड्या परदेशी असूनही त्या भारतीय पद्धतीने परिधान करतात.

राजकीय कार्यक्रमात सोनिया सुती साड्यांचा अधिक वापर करतात तर बाकी कार्यक्रमात त्या मध्यप्रदेशातील चंदेरी आणि सिल्क साड्यांचा वापर करतात. त्यातून त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील एलिगन्सी प्रतीत होते असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Leave a Comment