बंगळूरु- कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएममध्ये बँक मॅनेजर ज्योती उदय (44) यांच्यावर मंगळवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात डोक्याला जबर इजा झालेल्या ज्योती यांची प्रकृती आता ठीक असल्याचे बीजीएस ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
ज्योती उदय या बँकेच्या एटीएममध्ये मंगळवारी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करून अज्ञात हल्लेखोराने त्यांच्याजवळचे अडीच हजार रूपये आणि मोबाईल घेऊन पळ काढला होता. ज्योती उदय यांच्यावर हल्ला होत असतानाचे चित्रण एटीएममधील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. ज्योती यांच्या मारेक-याला पकडण्यासाठी बंगळूरु पोलिसांनी आंध्रप्रदेश, गोवा, केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पथके रवाना केली. तसेच त्यांचा मोबाईल फोन ट्रॅकिंगवर टाकण्यात आला होता. त्यानुसार, आंध्र प्रदेशमधून एकाला ताब्यात घेतले आहे.
ज्योती यांच्या नाकाची प्लॅस्टिक सर्जरी करावी लागणार आहे. यावेळी त्यांच्या चेह-यावर झालेल्या जखमांवरही उपचार करण्यात येतील, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या उजव्या बाजूच्या अंगाला पूर्णपणे लकवा मारला आहे. ज्योतीवर फिजिओथेरपिस्ट, न्युरो सर्जन, प्लॅस्टिक सर्जन आणि अन्य डॉक्टरांचे पथक विशेष लक्ष ठेऊन आहेत.