नागपूरात पवाराच्या अनुपस्थितीने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई – केंद्राची महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना नागपूरात काल सोनिया गांधींच्या हस्ते सुरू केली गेली मात्र या कार्यक्रमाला आमंत्रण घेऊनही  राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार अनुपस्थित राहिल्याने राज्यातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे. नवीन राजकीय समीकरणे जुळविली जात असून राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र नांदणार किवा नाही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काल सकाळी या योजनेचे सोनियाजींच्या हस्ते उद्घाटन होत असताना शरद पवार मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जनरल चेकअप साठी दाखल झाले व नंतर दुपारी ते कन्या सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी युवती मेळाव्याला मात्र यशवंतराव चव्हाण सेंटरला गेले. त्यामुळे पवार यांनी गांधी याच्यासमवेत एकत्र मंचावर येण्याचे जाणूनबुजून टाळले असल्याची चर्चा सुरू झाली.

राष्ट्रवादीतील अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे कबूल केले होते मात्र या कार्यक्रमातून केवळ काँग्रेसचाच फायदा आहे हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तशी सूचना त्यांनी संबंधितांना दिली असावी कारण आधीच्या पोस्टरवर गांधीसमवेत पवार यांचाही फोटो होता मात्र नवीन पोस्टरमध्ये पवार यांचे नांव व फोटो नव्हता असेही समजते.

Leave a Comment