रेल्वे रूळात स्कॉर्पिओ अडकली, पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत

पुणे -चिंचवडच्या दळवीनगर येथील जुन्या बंद गेटमधून घुसलेली स्कॉर्पिओ रेल्वे रुळामध्ये अडकल्याने पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली.

क्रेनच्या सहाय्याने स्कॉर्पिओ बाजूला काढून ही वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. तर घटनेनंतर स्कॉर्पिओ चालक पसार झाला आहे. दळवीनगर येथे जुने बंद रेल्वेगेट आहे. या रेल्वेगेटमधून आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास दारूच्या नशेतील चालकाने स्कॉर्पिओ येथून रेल्वे रुळावर घुसवली. दरम्यान, पुण्याकडून मुंबईकडे एक रेल्वेचे इंजिन जात होते. स्कॉर्पिओ गाडी रुळामध्ये अडकल्याचे पाहून स्कॉर्पिओतील दोघांनी खाली उतरून येत असलेल्या रेल्वे इंजिनकडे धाव घेतली. त्यांनी हातवारे पाहून रेल्वेच्या चालकाने हे इंजिन प्रसंगावधान राखून थांबवले. त्यामुळे एक मोठा अपघात टळला.

दरम्यान, रेल्वे रुळावर अडकलेल्या स्कॉर्पिओमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तर गाडी काढण्याचे काम सुरू असताना परिसरातील नागरिकांनीही येथे मोठी गर्दी केली होती. अखेर क्रेनच्या सहाय्याने सुमारे एक तासभरात ही स्कॉर्पिओ गाडी बाजूला काढण्यात आली. त्यानंतर येथील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. बेकादेशीररित्या गाडी घुसवणारा मद्यधुंद स्कॉर्पिओ चालक गाडी सोडून पसार झाला. तर त्याच्यावर अद्याप कसलीही कारवाई झाली नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.