पुणे – रुग्णालयाच्या बिलाचे उर्वरित साडेतीन लाख रुपये भरणं शक्य नसल्याने रुग्णालय प्रशासनाने तब्बल 31 तास अडीच वर्षाच्या बालकाचा मृतदेह पालकांच्या ताब्यात दिला नाही. अखेर शिवसेनेच्या दणक्यानंतर रुग्णालय प्रशासनानं नमतं घेत बिलाची रक्कम माफ करत मृतदेह पालकांच्या ताब्यात दिला. थेरगाव येथील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालयात आज (मंगळवारी) हा प्रकार झाला.
शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनाच घेराव घातल्याने बराच वेळ गोंधळाचं वातावरण होते. अंकीत जगदीश पांडे असं हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या बालकाचं नाव आहे. त्याचे आईवडिल मावळ तालुक्यातील इंदोरी येथे राहतात. अंकीतला न्युमोनिया झाल्याने त्याला 28 ऑगस्ट रोजी बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्या अगोदर त्याच्यावर तळेगाव येथील सेवाधाम रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, तेथे त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्याला बिर्ला हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं.
बिर्ला हॉस्पिटलमध्ये आल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याच्या विविध पकारच्या वैद्यकीय तपासण्या केल्या. या तपासण्यानुसार अंकीतच्या मानेला मनक्याचा आजार असल्याने त्याला श्वास घ्यायला अडचण येत असल्याचं निष्पन्न झाले. यातून बरं होण्यासाठी त्याच्यावर शत्रक्रिया करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर तो 20 टक्केच बरे होण्याची खात्रीही डॉक्टरांनी दिली. या शस्त्रक्रियेसाठी 2 लाख 6 हजार 232 खर्च अपेक्षित असल्याचं उपचार करणार्या डॉक्टरांनी अंकितच्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यानुसार त्याच्या पालकांनी ही रक्कम रुग्णालयात जमा केली. शस्त्रक्रियेव्यतिरिक्त इतर खर्च मिळून त्यांचं एकूण बील 10 लाख 48 हजार एवढं झालं. त्यापैकी सात लाख 34 हजाराची रक्कम त्यांनी जमा केली.
मध्यतंरीच्या काळामध्ये पैशाची अडचण निर्माण झाल्याने त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर रुग्णालयाने रुग्णालयामार्फत देण्यात येणारी औषधे देण्याचे थांबवून त्यांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितली. दरम्यान, अंकितची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने तो कोणत्याही उपचारांना पतिसाद देईनासा झाला. त्यामुळे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर उरलेली साडेतीन लाख रुपयांची रक्कम भरा आणि मृतदेह घेऊन जा, असा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतल्याने अंकीतचे नातेवाईक हवालदिल झाले. अखेर त्यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांना संपर्क साधून आपली कैफियत सांगितली. त्यांची कैफियत ऐकून बारणे यांच्यासह नगरसेविका सुलभा उबाळे आणि त्यांच्या सहकारी शिवसैनिकांनी रुग्णालयाकडे धाव घेत दुबे यांना त्यांच्या कार्यालयातच घेराव घातला. बिलाची रक्कम माफ केली, नाहीतर शिवसेनेच्या पध्दतीने हिसका दाखवू, असं सांगत शिवसैनिकांनी रुग्णालयातच ठाण मांडलं. शिवसेनेच्या या दणक्यानंतर प्रशासनानं नमतं घेत बिलाची साडेतीन लाखांची रक्कम माफ करत तब्बल 31 तासांनी मृतदेह पालकांच्या ताब्यात दिला.