छत्तीसगडमध्ये विक्रमी 75 टक्के मतदान

रायपूर – छत्तीसगड विधानसभा निवडणूकीच्या दुस-या आणि शेवटच्या टप्प्यात 75 टक्के मतदान झाले. राज्यात इतिहासात हा मतदानाचा विक्रम ठरला आहे. दुस-या टप्प्यात 19 जिल्ह्यातील 72 जागांसाठी मतदान झाले. मतदानादरम्यान सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.

मुख्यमंत्री रमण सिंग, विधानसभा अध्यक्ष धरमलाल कौशिक, विरोधी पक्ष नेते रवींद्र चौबे या बडया नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. दुपारी 12 वाजेपर्यंत 30 टक्के, तर तीन वाजेपर्यंत 55 टक्के मतदान नोंदवले. राज्यात 75 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकारी डी. डी. सिंह यांनी सांगितले. पोलिस उपमहासंचालक राम निवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेमेतरा जिल्हयातील साजा मतदारसंघातील भिंदरवानी मतदान केंद्रावर मद्यधुंद पाचजणांनी सीआरपीएफच्या जवानांशी हुज्जत घातली. या वेळी जवानाच्या बंदुकीतून अचानक गोळी निसटली. यात एक नागरिक ठार झाला तर एकजण जखमी झाला.

या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. मतदान शांततेत पार पडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केले होते.90 सदस्यांच्या छत्तीसगड विधानसभेसाठी एकूण 843 उमेदवार आपले नशीब आजमवत आहेत. मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सलग तिस-यांदा सत्ता मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी मतदान होत असलेल्या भागात एक लाख सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आले होते. राज्यात 11 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात 18 जागांसाठी 75. 53 टक्के मतदान झाले होते.