पहिल्याच स्मृतिदिनी राज ठाकरेंची अनुपस्थिती

मुंबई – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने रविवारी शिवसैनिकांसह शिवाजी पार्क पुन्हा गहिवरले. राज्यभरातून आलेल्या हजारो शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनादिवशी स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मात्र उपस्थित राहिले नाहीत. तर, दुसरीकडे बाळासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव यांनी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील स्मारकाला विरोध केला आहे.

नुसते स्मारक उभे करून काय फायदा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ठाकरे परिवारात गेल्या काही वर्षांपासून असलेली फूट कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाजी पार्कवर रविवारी सकाळपासूनच ‘परत या परत या, बाळासाहेब परत या’ अशी आर्त साद शिवसैनिक बाळासाहेबांना घालत होते. साहेबांच्या स्मृतिस्थळापुढे नतमस्तक होताना अनेकांना आश्रू अनावर झाले होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांच्या प्रत्येक शब्दाला मानणार्‍या, त्यांच्या प्रत्येक आदेशाला शिरसावंद्य मानणार्‍या शिवसैनिकांचे डोळे साहेबांच्या आठवणीने पाणावले होते. कंठ दाटून आले होते. बाळासाहेबांच्या आठवणी निघत होत्या. याच शिवतीर्थावर अनेक दसरा मेळाव्यात साहेबांनी दिलेले विचारांचे सोने अनेकांनी लुटले होते. त्याची आठवण निघत होती.

बाळासाहेबांच्या निधनाने अनेक शिवसैनिकांना प्रत्यक्ष पितृछत्रचं नाहीसे झाल्याची भावना झाली होती. साहेबांच्या दर्शनासाठी दिवसभर उन्हाची पर्वा न करता हजारो शिवसैनिकांनी रांगा लावल्या होत्या. सर्वांच्या मनात होती बाळासाहेबांची एकतरी आठवण. नेहमीच साहेबांच्या तेजस्वी भाषणाने दुमदुमणार्‍या शिवाजी पार्कावर मात्र साहेबांच्या आठवणीने मूक हुंदका उमटला होता. बाळासाहेबांच्या दर्शनासाठी शिवसैनिकांप्रमाणे सर्व महत्त्वाच्या पक्षांचे नेतेही हजर झाले होते. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनीही अनेक शिवसैनिकांशी संवाद साधला. अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचे वडीलकीच्या नात्याने सांत्वन केले. पण, या सगळ्यात राज ठाकरेंची अनुपस्थिती मात्र जाणवत होती.