काँग्रेसच्याच उमेदवारांना आता राहुल झाले नकोसे

नवी दिल्ली – दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीतील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिणपुरी भागात रविवारी झालेली राहुल गांधी यांची सभा पूर्णपणे अपयशी ठरली. या सभेच्या वेळी मैदानातील खुर्च्याही पूर्णपणे भरू शकल्या नाही. राहुल यांच्या सभेतून उठून जाणार्‍या लोकांना थांबविण्यासाठी खुद्द दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना विनंती करावी लागली होती.

या सार्‍यांची चर्चा देशभर होत असल्याने काँग्रेसच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. यामुळे दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती बिकट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचे युवराज उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला अतिशय कमी गर्दी झाली. रिकाम्या खुर्च्यांचेच सर्वत्र दर्शन होत होते. एवढेच नव्हे तर राहुल गांधींचे भाषण सुरू होण्यापूर्वीच लोक उठून निघून जाऊ लागले. राहुल गांधींच्या या फ्लॉप सभेमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचारासाठी ते आता नकोसे झाले आहेत.

आपल्या मतदारसंघात कोणत्याही मोठ्या नेत्याची प्रचार सभा ठेवू नका, अशी प्रार्थना काँग्रेसचे उमेदवार हायकमांडला करू लागले आहेत. दक्षिणपुरी येथील सभेप्रमाणे आपल्या मतदारसंघातील सभेतूनही लोक पळून तर जाणार नाहीत ना, अशी भीती त्यांना सतावत आहे. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेचे हे चित्र पाहून काँग्रेसचेही धाबे दणाणले आहे. आणखी एक-दोनदा असे झाल्यास नरेंद्र मोदींपुढे राहुल गांधींचा टिकाव लागणार नाही, अशी भीती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे.