नवी दिल्ली – केंद्र सरकारने भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या उद्देशाने एक नवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुरस्कार सेंटेनरी प्राईज् या नावाने ओळखला जाईल आणि तो भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या कलावंताला दिला जाईल. दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार दहा लाख रुपयांचा असेल. यावर्षी म्हणजे पहिल्याच पुरस्कारासाठी चित्रपट अभिनेत्री वहिदा रेहमान यांची निवड करण्यात आली आहे.
गोव्यात २० नोव्हेंबरला सुरू होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपाच्या समारंभात हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा चित्रपट महोत्सव दहा दिवस चालेल. म्हणजे हा पुरस्कार वितरण समारंभ ३० नोव्हेंबरला होईल. वहिदा रेहमान या ७७ वर्षे वयाच्या आहेत. जुन्या पिढीतील आघाडीच्या नायिका म्हणून त्या ओळखल्या जातात. या पुरस्कारासाठी कलाकारांची निवड करण्याकरिता नेमण्यात आलेल्या पाच सदस्यांच्या निवड समितीने वहिदा रेहमान यांची एकमुखाने निवड केली.
वहिदा रेहमान यांचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत. राम और शाम, गाईड आणि साहिब बीबी और गुलाम या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या असून या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना भारत सरकारने १९७२ साली पद्मश्री किताब दिला असून २०११ साली पद्मभूषण किताबाने भूषविले आहे. सरकारने पहिल्याच शतकी पुरस्कारासाठी त्यांची निवड करून त्यांचा योग्य तो सन्मान केला आहे.