नवी दिल्ली – नवी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मुख्य मंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शीला दीक्षित यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला आहे. केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांचा पराभव करून भ्रष्टाचाराला धडा शिकविण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
केजरीवाल यांनी यावेळी आपली मालमत्ता जाहीर केली. आपण आपली पत्नी या दोघांची मिळून दोन कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी लेखी दिले आहे. गाझियाबाद येथे एक खुला प्लॉट आणि पत्नीच्या नावाने गुडगाव येथे सदनिका असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत १,१८९ अर्ज दाखल झाले आहेत.
या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे राजौरी गार्डन या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मनजिंदरसिंग सिरसा हे या निवडणुकीतले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची मालमत्ता २३५ कोटी रुपयांची आहे. तर दुसर्या बाजूला भारतीय नौजवान इन्कलाब या पक्षाचे बुरारी मतदारसंघातले उमेदवार गुलाब सिंघल हे सर्वात गरीब उमेदवार असून त्यांच्या खिशात आता सुद्धा एक पैसाही नाही असे त्यांनी जाहीर केले आहे.