देशभर इंडस्ट्रीयल टाऊनशीप प्रस्थापित करणार

सांघोल (पंजाब) – केंद्रीय व्यापार मंत्री आनंद शर्मा यांनी सरकार लवकरच देशभरामध्ये अधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी इंडस्ट्रीयल टाऊनशीप योजना राबवणार असल्याचे जाहीर केले. या योजनेतून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पंजाबच्या ङ्गतेहगड साहीब जिल्ह्यातील सांघोल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना आनंद शर्मा यांनी ही घोषणा केली. भारतामध्ये जनतेच्या सहभागातून गेल्या काही वर्षात बरीच मोठी प्रगती साध्य झाली आहे, असा दावा त्यांनी केला. तरुणांना नवे उपयुक्त शिक्षण मिळत आहे आणि त्यामुळे त्यांना नव्या नोकर्‍या निर्माण करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

देशामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमुळे बरेच मोठे परिवर्तन घडले आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. या योजनेने जसे सामाजिक परिवर्तन घडवले आहे तशाच परिवर्तनाचा विचार खाजगी क्षेत्रांनीही केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात भाषण करताना विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. वेदप्रकाश यांनी भारतामध्ये उच्च शिक्षणाची जगातली सर्वात मोठी यंत्रणा असल्याचे सांगितले.