पुणे – केंद्राच्या नॅशनल सव्र्हिस स्कीम कार्यक्रमानुसार राज्यभरातील १५ हजार कॉलेज युवतींना आत्मसंरक्षणासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुणे विद्यापीठानेही या कार्यक्रमांतर्गत २५०० विद्यार्थीनिना असे प्रशिक्षण देण्याचे ठरविले असून त्यासाठी पुणे , नगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांकडून मुलींची नांवे मागविली आहेत.
महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेनदिवस वाढतच चालले आहे. त्यावर उपाय म्हणजे महिलांनाच स्वतः प्रतिकारक्षम बनविणे हा असून त्यासाठीच हे स्वसंरक्षणाचे तंत्र तज्ञांकडून शिकविले जात असल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमाचे को ऑर्डिनेटर पंडित शेळके म्हणाले की या स्वसंरक्षणाच्या कार्यशाळा राज्याच्या विविध भागात आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणामुळे मुलींना आत्मबळ मिळते आणि त्या निर्भय होतात असा पूर्वीचा अनुभव आहे.
या कार्यशाळेत आत्पकालीन स्थिती ओढवलीच तर काय करायचे याची दहा तंत्रे मुलींना शिकविली जाणार आहेत. छेडछाड करणार्यांना कसा धडा शिकवायचा, अत्याचार होत असतील तर त्याविरोधात काय पवित्रा घ्यायचा अशा विविध बाबी येथे शिकविल्या जाणार आहेत. त्यासाठी स्वयेसेवी संस्था, मार्शल आर्टचे शिक्षण देणार्या संस्था यांची मदत घेतली जाणार आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ४० महाविद्यालयांतील युवतींचा समावेश केला जाणार असून या कार्यशाळेसाठी जी महाविद्यालये सहभागी होण्याची तयारी दाखवितील त्यांना पुणे विद्यापीठाकडून १० हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे जेणेकरून अधिकाधिक महाविद्यालयांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असा यामागचा उद्देश आहे.