जगनमोहन रेड्डी दिल्लीत

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी हे शनिवारी दिल्लीत आले असून ते विविध पक्षांच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण राज्याची निर्मिती करण्यास आपला का विरोध आहे हे श्री. रेड्डी या नेत्यांना पटवून देतील आणि राज्य विभाजनाच्या मागणीस त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करतील.

सुरूवातीला श्री. रेड्डी भारतीय कम्युनिष्ट पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टीच्या नेत्यांच्या भेटी घेतील आणि सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना भेटतील. दिल्लीतल्या या भेटीगाठी संपल्यानंतर देशातल्या अन्य काही राजधान्यांना भेट देण्याचा कार्यक्रम आहे. विशेषतः ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष समर्थ असतील त्या राज्यात जाऊन त्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा त्यांचा विचार आहे.

मागच्या महिन्यात जगनमोहन रेड्डी यांनी सोनिया गांधी यांच्यावर राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी आंध्राचे विभाजन केले जात आहे. असा आरोप केला होता. त्यामुळे ते सोनिया गांधींची भेट घेणार नाहीत परंतु सोनिया गांधी यांनी राज्य विभाजनाला असलेल्या विरोधाची दखल घेतली आहे आणि या निर्णयाचा अधिक विचार करण्यासाठी ७ केंद्रीय मंत्र्यांची समिती नेमली आहे.