श्रीकांत मोघे, गुरू ठाकूर, विभावरी जोशी यांना गदिमा पुरस्कार जाहीर

पुणे, ( प्रतिनिधी): मराठीतील ज्येष्ठ कवी ग दि माडगूळकर यांच्या स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रात व्यक्तींना दिल्या जाणार्‍या ‘गदिमा पुरस्कारां’ची आज घोषणा करण्यात आली. साहित्य, कला क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘गदिमा पुरस्कार’ यंदा जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना जाहीर झाला आहे.हे पुरस्कार गदिमाप्रतिष्ठानच्या वतीने दिले जातात. एकवीस हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे गदिमा पुरस्काराचे स्वरुप आहे,असे गदिमा प्रतिष्ठानचे सचीव आनंद माडगूळकर यांनी जाहीर केले आहे.

गदिमा पुरस्काराबरोबरच दिला जाणारा ‘गृहिणी सखी सचिव’ पुरस्कार पं.जसराज यांच्या पत्नी व दिग्दर्शिका मधुरा जसराज यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. युवा व्यक्तीमत्वाला दिला जाणारा ‘चैत्रबन पुरस्कार’ अभिनेते गुरू ठाकूर यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. नवोदित गायिकांना देण्यात येणारा दुसरा ‘विद्या प्रज्ञा पुरस्कार’ गायिका विभावरी आपटे-जोशी यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणारे ‘गदिमा पारितोषिक’ कलवापूर येथील प्रतिक फाळके या विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे. अडीच हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पारितोषेकाचे स्वरुप आहे.

येत्या 14 डिसेंबर रोजी गदिमांच्या 36व्या स्मृतीदिनी संध्याकाळी पाच वाजता टिळक स्मारक येथे या पारितोषेकांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी ना.धों. महानोर असणार आहेत.