जनमत चाचण्यांची कॉंग्रेसला दहशत

बेमेत्रा (छत्तीसगड) – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये होणार असलेल्या दुसर्‍या टप्प्यातल्या मतदानाच्या आधी घेतलेल्या जाहीर सभांमध्ये कॉंग्रेसवर जनमत चाचण्यांना विरोध केल्याबद्दल प्रखर टीका केली. जनमत चाचण्यांतून कॉंग्रेसच्या पराभवाचे संकेत मिळत असल्यामुळे कॉंग्रेसचे नेते धास्तावले आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यातूनच कॉंग्रेसच्या नेत्यांनी अनाकलनीय मागण्या करायला सुरुवात केली असून विचित्र डावपेचही सुरू केले आहेत असे श्री. मोदी म्हणाले.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी छत्तीसगडला केंद्राने भरपूर मदत दिल्याचे सांगत आहेत. पण ही मदत काही राहुल गांधीच्या मामाच्या गावाहून (इटलीतून) आलेली नाही, असे प्रत्यूत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी मुळाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला.

कॉंग्रेस पक्ष जनतेला भरपूर आश्‍वासने देतो, परंतु ते आश्‍वासने पाळत नाही. तेव्हा कॉंग्रेस पक्षाने लोकांना स्वस्त तांदूळ देण्याचे आणि चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे आश्‍वासन पाळून दाखवावे, असे आव्हान मोदी यांनी दिले. कॉंग्रेसची सत्ता असलेल्या कोणत्याही राज्यात चोवीस तास वीज पुरवठा केला जात नाही, असे त्यांनी दाखवून दिले.