बसपा खासदार बलात्काराबद्दल अटकेत

नवी दिल्ली – मोलकरणीच्या खुनाच्या संदर्भात अटकेत पडलेले बहुजन समाज पार्टीचे खासदार धनंजयसिंग यांच्यावर एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ४२ वर्षे वयाच्या एका महिलेने दिल्लीच्या पांडवनगर पोलीस ठाण्यामध्ये धनंजयसिंग यांच्या विरुद्ध ही ङ्गिर्याद दाखल केली असून, त्यांनी आपल्यावर बंदुकीचा धाक दाखवून अनेकवेळा बलात्कार केला असे म्हटले आहे.

सरकारी कर्मचारी असलेल्या या महिलेने आपल्या ङ्गिर्यादीमध्ये धनंजयसिंग यांच्या पूर्व दिल्लीतील मयूर विहार ङ्गेज-१ मधील निवासस्थानी २००५ ते २००९ या कालावधीत आपल्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचे म्हटले आहे. आपण या खासदाराला २००५ साली पहिल्यांदा भेटलो. आपल्या पतीने त्यांना जेवणासाठी बोलावले होते आणि त्यावेळी आपली ओळख झाली. मात्र या ओळखीनंतर खासदार धनंजयसिंग आपल्या घरी वारंवार यायला लागले. विरोध करून सुद्धा त्यांनी आपल्यावर बलात्कार केला.

याआधी आपण ही गोष्ट पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंंतु धनंजयसिंग यांनी सतत धमक्या दिल्यामुळे आपण ते टाळले. आता मात्र त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे आपण धाडस करून ही ङ्गिर्याद दाखल करत आहोत, असे या महिलेने म्हटले आहे. धनंजयसिंग आणि त्यांची पत्नी जागृतीसिंग त्यांच्या मोलकरणीच्या खुनाच्या संदर्भात अटकेत आहेत. ते उत्तर प्रदेशातल्या जौनपूर मतदार संघातून निवडून आलेले आहेत आणि त्यांच्यावर आतापर्यंत १२ गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेशाचे आरोग्य संचालक बछिपाल यांच्याही खुनाचा आरोप धनंजयसिंग यांच्यावर होता.