अलविदा सचिन

आज जगभरातले क्रिकेटशौकीन कामधाम सारे विसरून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमकडे डोळे लावून बसले आहेत कारण त्यांचा सर्वात आवडता क्रिकेटपटून सचिन तेंडुलकर २४ वर्षांच्या देदिप्यमान खेळीतून निवृत्त होत आहे. सचिनने चाळिशी गाठल्याचे दिसायला लागले तशी देशातल्या क्रिकेटविश्‍वात त्याच्या निवृत्तीची चर्चा व्हायला लागली होती. ती साहजिकच होती कारण क्रिकेटच्या खेळात निवृत्तीचे वय ज्याला म्हणतात ते सचिनने दोन तीन वर्षांपूर्वीच गाठले होते. गावसकरचा अपवाद वगळता बहुतेक क्रिकेटपटू याच वयाच्या आसपास क्रिकेटला अलविदा करून निवृत्त झाले होते. सचिनच्या खालोखाल ज्याचे नाव घेतले जाते तो राहुल द्रविड हाही नुकताच निवृत्त झालेला. तेव्हा सचिनच्या निवृत्तीची चर्चा काही अनाठायी नव्हती. या चर्चेत दोन प्रकार होते. पहिला प्रकार होता तो क्रिकेट शौकिनांचा. जे सचिनचे चाहते आहेत पण जे क्रिकेटकडे एक खेळ म्हणून वस्तुनिष्ठपणे पाहतात असे लोक सचिनने निवृत्त व्हावे या मताचे होते. कारण कोणीही क्रिकेटपटू झाला तरी त्याने एकना एक दिवस निवृत्त झालेच पाहिजे. जो खेळतो त्याची निवृत्ती अपरिहार्य असते मग तो किती का मोठा खेळाडू असेना. असे मानणारे लोक आता त्याचे वय झाल्याने त्याच्या निवृत्तीची अपेक्षा करीत होते.

तो थकलाय म्हणून त्याने निवृत्त व्हावे असे मात्र कोण म्हणत नव्हते कारण सचिन थकलेला नव्हता. वयपरत्वे खेळात थोडी शिथिलता येणारच असेही म्हणण्याची सोय नव्हती. खेळाच्या विक्रमी कारकीर्दीत चढ उतार हे असणारच पण तरीही आता सचिनच्या निवृत्तीची वेळ झालीय म्हणून त्याने निवृत्त झालेच पाहिजे असे कोणाचे म्हणणे नव्हते. दुसरा एक वर्ग होता तो सचिनवेडा. आपल्या देशातल्या अनेक लोकांना क्रिकेटविषयी काही आवड नाही पण केवळ सचिन आहे म्हणून ते क्रिकेटचे सामने पहात होते. सचिन असेल तर क्रिकेटचा सामना पाहणार. सचिन नसेल तर क्रिकेट मध्ये काही रस नाही असा एक वर्ग आहे. ते तर सचिनला देवच मानतात. हजारो लाखो लोकांच्या आवडीचा विषय झालेल्या अनेक लिव्हींग लिजेंडना आपल्या चाहत्यांंचे दुर्लभ प्रेम लाभते पण सचिनच्या चाहत्यांचे प्रेमच आगळे वेगळे. त्यांना सचिनच्या खेळातली मरगळ आणि थकले पणा या गोष्टीच सहन होण्यातल्या नाहीत. सचिन सदाबहारल असला पाहिजे, त्याची बॅट सदा तळपलीच पाहिजे आणि त्याने धावांची बरसातच केली पाहिजे अशी या लोकांची सदाचीच वेडी अपेक्षा असायची.

पण त्यांना हेही माहीत आहे की, सचिन नेहमीच असा परङ्गॉर्मन्स दाखवू शकणार नाही. म्हणून त्याने खेळत रहा पण थकला असशील तर तुझे थकलेले दर्शन घडण्याच्या आत निवृत्त हो असे या सचिन वेड्यांचे म्हणणे असे. त्यांच्या आणि सर्वांच्याच कल्पनेप्रमाणे सचिन आज निवृत्त होत आहे. खरे तर तो आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. या पूर्वी वन डे आणि मर्यादित षटकांच्या अशा दोन्ही प्रकारांतून तो टप्प्या टप्प्याने तो निवृत्त झालेलाच आहे. सचिन हा जगातला एक अद्वितीय खेळाडू आहे आणि अगदी पाकिस्ताननेही ही बाब मान्य केली आहे. जगातला सर्वात श्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या डॉन ब्र्र्रॅडमन यांनीही सचिनला क्रिकेटमधला देव असे म्हणून त्याचा गौरव केला आहे. जगात आजवर सचिनवर अनेकांनी अनेक प्रकारची शब्द सुमने उधळली आहेत पण त्याचा सर्वात मौल्यवान गौरव कोणता असेल तर तो ब्र्र्रॅडमन यांनी केलेला आहे. एका सर्वोच्च पदावर असलेल्या क्रिकेटच्या खेळाडूने विक्रमादित्य सचिनची स्तुती करतानाही जगातल्या सर्वात श्रेष्ठ अशा देवाची उपमा दिली आहे.सचिनने अनेक विक्रम नोंदले गेल्याने त्याला क्रिकेटमधला विक्रमादित्य म्हटले जाते पण या विक्रमादित्याची निवृत्तीसुद्धा विक्रमी पद्धतीने साजरी होत आहे. ती सन्मानाने होत आहे.

नाहीतर खेळ गळाठला आहे आणि निवड समितीने निवडच केली नाही म्हणून निवृत्ती स्वीकारली आहे अशी काही निरुपायाने निवृत्त होण्याची वेळ त्याच्यावर आलेली नाही. त्याच्या असंख्य चाहत्यांना याचे नक्कीच समाधान आहे. सचिनच्या निवृत्तीच्या या वेळी त्याच्या आजवरच्या २४ वर्षांतल्या खेळाची अनेक दृष्ये डोळ्यसमोर येत आहेत. या निरोपाच्या वेळी एका गोष्टीचे खरेच आश्‍चर्य वाटते की, खरेच त्याने पाव शतकभर सारख्याच तडङ्गेने खेळ केला आहे का ? कारण याही बाबतीत त्याने विक्रमच केला आहे. आता या मोक्यावर शरद पवार यांनी एसीसीचे अध्यक्ष म्हणून घोषणा करून कांदिवलीच्या मैदानाला सचिन तेंेडुलकरचे नाव दिले आहे. सचिनच्या सार्‍या करीयरकडे पाहून एक वेगळा प्रश्‍न मनात येत असतो. त्याचा सर्वांनी विचार करावा. सचिन तेंडुलकरच्या आई वडलांंनी त्याच्या हातातल्या कसबाकडे दुर्लक्ष करून आणि त्याच्या रक्तातल्या क्रिकेटला विसरून अन्य मध्यमवर्गीय पालकांप्रमाणे त्याच्यामागे कसेही करून डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचा तगादा लावला असता आणि त्याला त्यासाठी ट्यूशन क्लासच्या चरकातून पिळून काढले असते तर आपल्याला एवढा श्रेष्ठ क्रिकेटपटू पहायला तरी मिळाला असता का?

Leave a Comment