कॉंग्रेसमधला संभ्रम

भारतीय जनता पार्टीने बर्‍याच वादंगानंतर आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. ही निवड ङ्गार लवकर झाली असे शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना वाटत असले तरी या प्रश्‍नावरचा भारतीय जनता पार्टीचा गोंधळ आणि संभ्रम संपला आहे हे तरी नक्की दिसत आहे. कॉंग्रेस मध्ये मात्र राहुल गांधींना आपला उमेदवार म्हणून जाहीर करावे की नाही. याबाबत गोंधळाचे वातावरण आहे. हे गोंधळाचे वातावरण नरेंद्र मोदी यांनी उभ्या केलेल्या आव्हानामुळे निर्माण झाले आहे आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत काय भूमिका घ्यावी याही विषयी पक्षात गोंधळ असल्याचे दिसत आहे. म्हणूनच काल अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी नरेंद्र मोदी यांचे कॉंग्रेससमोर आव्हान आहे असे म्हटले पण त्याच्या दुसर्‍याच दिवशी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी असे काही आव्हान नसल्याचे सांगून चिदंबरम् यांचे विधान खोडून काढले आणि पक्षात या संबंधात किती संभ्रमाचे वातावरण आहे हे दाखवून दिले. याचा अर्थ असा होतो की मोदी यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना अस्वस्थ करून सोडलेले आहे. मोदी ङ्गार लोकप्रिय आहेत हे कॉंग्रेसला जाणवत आहे. लोक सध्या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात तुलना करत आहेत आणि नरेंद्र मोदी राहुल गांधीपेक्षा अधिक सक्षम असल्याचे लोकांना टी.व्ही.वरच्या त्यांच्या चित्रिकरणातून दिसत आहे.

राहुल गांधी हे मोदी यांच्यापुढे ङ्गिके पडत असतील तर कॉंग्रेसच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होणार हे कॉंग्रेसच्या नेत्यांनी उघडपणे मान्य केले नसले तरी लोकांना ते लक्षात येत आहे आणि कॉंग्रेसचे नेते लक्षात येऊनसुध्दा उघडपणे तसे बोलून दाखवत नाहीत. कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदींचा हा प्रभाव लक्षात घेऊन त्यांच्या बदनामीची मोहीम सुरू केली आहे. पण कॉंग्रेसचे दुर्दैव असे की मोदींची बदनामी करावी असा ङ्गारसा दारूगोळा त्यांच्याकडे नाही आणि जो आहे तो ङ्गुसका आहे. त्यामुळे असे ङ्गुसके बार सोडले की ते कॉंग्रेसच्याच अंगलट येत आहेत. दूरचित्रवाणीवरून सुरू असलेली ही जुगलबंदी मोदीच जिंकत आहेत आणि लोकांना हे जाणवत आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोदी हे कॉंग्रेस समोरचे आव्हानच नाही, असे विधान केले आहे. अशा विधानांमध्ये एक ङ्गसवेपणा असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. जर मोदी यांचे कॉंग्रेससमोर आव्हानच नसेल तर तसे मुद्दाम सांगण्याची गरज काय? ज्या अर्थी कोणी न विचारताही कॉंग्रेसचे नेते मोदींचे आव्हान नसल्याचे सांगत आहेत त्याअर्थी त्यांना हे आव्हान जाणवत आहे हे उघड होते. कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदींचा धसका घेतल्याचे हे लक्षण आहे. या धसक्याच्याबाबतीसुध्दा या पक्षात एकवाक्यता नाही.

अर्थमंत्री पी.चिदंबरम् यांनी नरेंद्र मोदी हे कॉंग्रेसपुढचे आव्हान आहे असे स्पष्टपणे कबुल केलेले आहे. मात्र त्याचवेळी देशाचे गृहमंत्री मात्र मोदी हे आव्हानच नाही असे सांगत आहेत. नरेंद्र मोदी हे कॉंग्रेससमोरचे आव्हान आहे की नाही. यावर जनतचे मत घेतले तर जनता होकारार्थी उत्तर देईल. कारण ते समोर दिसतच आहे. पण तरीसुध्दा कॉंग्रेसचे नेते आपल्या मनाचे समाधान करून घेत आहेत. भाजपाचा प्रचार हा शहरी भागापुरता मर्यादित असतो आणि तो कितीही जोरदारपणे होताना दिसत असला तरी त्यांना ग्रामीण भागात कोणी विचारत नसल्यामुळे त्यांच्या प्रचाराचा ङ्गुगा ङ्गुटतो. कॉंग्रेसला मात्र ग्रामीण भागात लोक मानतात आणि शहरात प्रचार झाला नाही तरी गरीब, दलित, मुस्लीम आणि ग्रामीण जनतेच्या जोरावर कॉंग्रेसला सहज बाजी मारता येते. असा कॉंग्रेसच्या नेत्यांचा हिशोब आहे. त्यात अगदीच तथ्य नाही असे नाही. पण हे कॉंग्रेसचे नेते दोन गोष्टी विसरत आहेत. एक म्हणजे नरेंद्र मोदी हे तीनवेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून येऊन यशस्वी नेते ठरलेले आहेत. तर राहुल गांधी पाच निवडणुकात सपाटून मार खाऊन पराभूत नेता असा शिक्का घेऊन बसलेले आहेत. त्यांनी आजपर्यत कधीही कोणतीही जबाबदारी पार पाडलेली नाही.

नरेंद्र मोदी हे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले आहेत आणि ते उच्चवर्णीय नाहीत. शिवाय एरवीच्या भाजपाच्या नेत्यापेक्षा ते जास्त लोकप्रिय आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टी. व्ही. वरून होणारा प्रचार आता शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या समाधानासाठी कितीही युक्तिवाद केले तरी नरेंद्र मोदी यांचे आव्हान त्यांनी सहजपणे घ्यावे असे राहिलेले नाही. म्हणूनच पी. चिदंबरम यांनी नरेंद्र मोदी यांचे आव्हान असल्याचे कबूल केले आहे. त्यांच्या या कबुलीमध्ये राहुल गांधी हे म्हणावे तेवढे सक्षम नाहीत हे सूचित केले गेले आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी आज नरेंद्र मोदी हे आव्हान नाही असे उलट विधान केले आहे. नरेंद्र मोदी हे खरोखर आव्हान असोत की नसोत पण त्यांच्या विषयी कोणी, काय आणि कसे बोलायचे याबाबत कॉंग्रेसचे धोरण ठरलेले असायला पाहिजे. परंतु तसे ते ठरलेले नाही आणि त्यामुळे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्येच संभ्रमावस्था निर्माण झालेली दिसत आहे. पी. चिदंबरम् यांनी दिलेल्या कबुलीतसुध्दा एक वेगळा डाव आहे. नरेंद्र मोदी यांचे आव्हान पेलण्यास राहुल गांधी पुरेसे नाहीत. हे त्यांना दाखवून द्यायचे आहे आणि मोदींच्या विरोधात राहुल गांधींच्या ऐवजी पंतप्रधान म्हणून आपला विचार केला जावा असे त्यांना सुचवायचे आहे.

Leave a Comment