आंध्रात मुख्यमंत्री व्हायला कोणीच राजी नाही

हैदराबाद – हैदराबादचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी तेलंगण निर्मितीच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. कॉंग्रेस पक्षाने घेतलेल्या एका निर्णयाला कॉंग्रेसचे मुख्यमंत्री विरोध करतात हे चित्र पक्षासाठी घातक असल्यामुळे कॉंग्रेस श्रेष्ठींनी किरणकुमार रेड्डी यांना हाकलून त्याजागी नवे मुख्यमंत्री नेमण्याची कवायत सुरू केली आहे. परंतु आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री व्हायला एकही कॉंग्रेस नेता राजी नाही. त्यामुळे पक्षाची पंचाईत झाली आहे.

सीमांध्र भागातल्या जनतेला राज्याचे विभाजन पसंत पडलेले नाहीच, पण ही जनता विभाजनाला प्रखरपणे विरोध करत आहे. या पार्श्‍वभृूमीवर किरणकुमार रेड्डी हे विभाजनाला अधिकाधिक विरोध करत आहेत आणि आपल्याच पक्षाच्या नेत्यांविरुद्ध शड्डू ठोकत आहेत. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेसचे आंध्रातील प्रभारी दिग्विजयसिंग अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी नवा नेता शोधण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने थांबवले. आता त्यांनी किरणकुमार रेड्डी यांना सौम्य भूमिका घेण्यासाठी राजी करण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्याबरोबर सीमांध्रा भागातल्या जनतेलाही खूश करण्याची केविलवाणी धडपड कॉंग्रेस पक्षाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राज्याच्या विभाजनानंतर सीमांध्र भागाला एक हजार कोटी रुपयांची विशेष मदत दिली जाईल, अशी घोषणा करून तिथल्या जनतेला आमीष दाखवले आहे.